Skip to Content

मका लागवड पद्धती

18 October 2025 by
Vitthal Gadakh
| No comments yet
​महाराष्ट्र राज्यात हरभरा, सोयाबीन आणि गहू या पिकांमध्ये घटलेले उत्पन्न, वाढता खर्च आणि अस्थिर बाजारभाव यामुळे अनेक शेतकरी आता मका लागवडीकडे वळत आहेत. मका हे कमी जोखीम आणि अधिक उत्पादनक्षम पीक असल्याने त्याची मागणी वाढत आहे.
​​मका पिकामध्ये झाडांमधील योग्य अंतर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य अंतरामुळे झाडांना प्रकाश, पाणी व पोषणद्रव्यांचा समप्रमाणात वापर करता येतो, ज्यामुळे वाढ संतुलित होते आणि कणसांची संख्या तसेच वजन वाढते. खूप दाट लागवड केल्यास झाडांमध्ये स्पर्धा वाढते व उत्पादन घटते, तर जास्त विरळ लागवड केल्यास जमिनीचा पूर्ण वापर होत नाही.
मका लागवडीकरीता अनेक प्रकारच्या लागवड पद्धती वापरल्या जातात. पण अधिक उत्पादनाकरिता सर्वात योग्य पद्धत कोणती? हे आज आपण जाणून घेऊ.

१) पारंपरिक लागवड पद्धत 
    पारंपारिक मका लागवड पद्धतीमध्ये आपण दोन ओळींतील अतंर ६० सेंमी (२ फूट) आणि दोन झाडांतील अंतर २० सेंमी असते. या पद्धतीत एकरी २५ ते ३० हजार झाडी येतात. हे अंतर कमी असल्याने पोषक तत्वे आणि सूर्यप्रकाशासाठी रोपांमध्ये स्पर्धा होते व उत्पादनात घट दिसून येण्याची शक्यता असते.

२) सरी वरंबा पद्धत
    या लागवड पद्धतीत, मका सरींच्या कडेला लावला जातो. ही पद्धत विशेषतः जास्त पाऊस होणाऱ्या ठिकाणी फायदेशीर ठरते. या पद्धतीचे मुख्य फायदे म्हणजे, पाण्याचा योग्य निचरा होतो, ज्यामुळे पीक सडत नाही. सरी मध्ये अतंरपीक घेणे शक्य होते.
या पद्धतीचा वापर करताना मुख्य तोटा म्हणजे नियोजन योग्य न केल्यास, वरंब्यावरील रोपांना पुरेसे पाणी मिळत नाही. 


३) जोड ओळ पद्धती
      हि लागवड पद्धत सर्वात योग्य व अधिक उत्पादन देणारी पद्धत आहे. यामध्ये दोन सलग ओळी ४५ सेंमी (१.५ फूट) पेरल्या जातात व ८० ते ९० सेंमी (२.५ फूट) अंतरानंतर पुन्हा जोड ओळी पेरल्या जातात. अंतर जास्त असल्याने पोषक तत्वे आणि सूर्यप्रकाशासाठी रोपांमध्ये स्पर्धा कमी होते व उत्पादनात वाढ दिसून येते. दोन जोड ओळींतील अंतर जास्त असल्याने अंतरपीकही घेता येते. पण योग्य आंतरपिकाची निवड न केल्यास दोन्ही पिकांमध्ये स्पर्धा निर्माण होऊ शकते.

चीन लागवड पद्धती हि सध्या शेतकरी बांधवांच्या चर्चेचा विषय आहे. हि पद्धत खरच एकरी ६० क्विंटल उत्पादन देते का? यावर प्रश्न विचारत असतात हि पद्धत जोड ओळ पद्धती सारखी आहे. पण एका जागी दोन मक्याची झाडे उगवली जातात. मका हे अंतर जास्त असल्यास अधिक उत्पन्न देणारे पीक आहे. एका जागी दोन रोपे लावल्यास रोपांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. तर जोड ओळ पद्धत हि चीन लागवड पद्धती पेक्षा योग्य आहे याबद्दल तुमचे काय मत आहे?

Share this post
Tags
Sign in to leave a comment