सध्या राज्यातील बरेच शेतकरी खरीप पीक काढणी पूर्ण करून रब्बी हंगामाच्या तयारीला सुरुवात करत आहेत. महाराष्ट्र राज्यात मुख्यतः रब्बी हंगामात हरभरा पिकाची लागवड केली जाते. मात्र, दरवर्षी येणारी एक सामान्य समस्या म्हणजे सोयाबीन पिकाची काढणी व मळणी उशिरा होणे. त्याचबरोबर मशागत वेळेत न होणे. यामुळे हरभरा पेरणीला उशीर होतो आणि त्याचा परिणाम tहेत उत्पादनावर होतो.
या दरवर्षी येणाऱ्या समस्येला प्रभावी व शाश्वत समाधान म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान वापरल्याने फक्त वेळच वाचत नाही तर जमिनीत ओलावा टिकतो, खर्च कमी होतो आणि उत्पादनातही वाढ दिसून येते. चला तर मग, शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे काय? त्याचे फायदे व वापरण्यापूर्वी घ्यायची काळजी याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे काय?
शून्य मशागत म्हणजे जमिनीवर कोणतीही मशागत न करता थेट पेरणी करणे. खरीप पीक काढणीनंतर शेतात राहिलेला काडीकचरा काढून न टाकता थेट पेरणी केली जाते. या पद्धतीत पीक उगवणीपूर्वी किंवा वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत योग्य तणनाशकांचा वापर करून तणांचे प्रभावी नियंत्रण केले जाते.
पीक काढणीच्या वेळी पिक जमिनीलगत कापली जातात आणि त्यांची मुळे व खोडांचे अवशेष तसेच जमिनीत कुजू दिले जातात. त्यामुळे मातीची नैसर्गिक रचना बाळंत नाही व सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढते.
शून्य मशागत तंत्रज्ञानाचे फायदे
- मातीतील ओलावा टिकून राहतो
मशागत न केल्याने जमिनीतल ओलावा बाष्पीभवनाद्वारे कमी प्रमाणात नष्ट होतो. हा ओलावा रब्बी पिकाच्या उगवणीसाठी उपयुक्त ठरतो. - वेळेवर पेरणी शक्य होते
मशागत न केल्याने वेळेत पेरणी होते. हरभऱ्यासारख्या पिकासाठी वेळेवर पेरणी ही चांगल्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाची असते. - मातीची संरचना व सुपिकता सुधारते
सतत मशागत केल्याने माती घट्ट होते. शून्य मशागत पद्धतीत माती सच्छिद्र राहते, सूक्ष्मजीवांची हालचाल वाढते व मातीचे आरोग्य सुधारते. - उत्पादन खर्च कमी व नफा वाढ
मशागत न केल्याने मशागत प्रक्रियेला लागणारा खर्च कमी होतो. वेळेवर पेरणीमुळे उत्पादन वाढल्याने नफा जास्त मिळतो.
शून्य मशागत तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी घ्यायच्या काळजीच्या बाबी
- काडीकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन:
खरीप पीक काढणीनंतर जर शेतात काडीकचऱ्याचे प्रमाण जास्त असलयास त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पेरणी पट्टा पिकाच्या उगवणीसाठी साफ ठेवणे गरजेचे आहे. - तण व्यवस्थापनावर लक्ष:
सुरुवातीच्या काळात तणांची वाढ जास्त होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळी तणनाशक फवारणी करणे आणि तण नियंत्रणावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. - तंत्रज्ञान समजून घेणे:
जे शेतकरी बांधव प्रथमच शून्य मशागत तंत्रज्ञान वापरण्याचा विचार करत आहेत, त्यांनी कृषी संशोधक, कृषी विभाग किंवा अनुभवी शेतकऱ्यांच्या प्रात्यक्षिकांना भेट देणे व तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक आहे.
परिवर्तित हवामान परिस्थिती, मजुरीचे दर आणि यंत्रसामग्रीचा वाढता खर्च याचा विचार करता शून्य मशागत तंत्रज्ञान हे आधुनिक शेतीसाठी एक परिणामकारक उपाय ठरू शकतो.