यावर्षी रबी हंगाम सुरु झाला आणि पावसाचा जोर सुद्धा वाढला, या पावसामुळे जमिनीतील हानिकारक बुरशी वाढली आहे. या परीस्तीतीमध्ये हरभरा आणि तूर या पिकावर बुरशीजन्य (मर) रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ शकतो. आपल्या पिकावर बुरशीजन्य (मर) रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काही उपाय योजना कराव्या लागतील त्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे ट्रायकोडर्मा .
ट्रायकोडर्मा ही एक उपयुक्त बुरशी असून, सेंद्रिय पदार्थांच्या सान्निध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी मातीमध्ये वाढणारी, परोपजीवी तसेच इतर रोगकारक बुरशींवर जगणारी आहे. ट्रायकोडर्मा या बुरशीच्या अनेक प्रजाती आहेत पण त्यापैकी ट्रायकोडर्मा व्हीरीडी, ट्रायकोडर्मा हरजानियम या मोठ्या प्रमाणात जैविक नियंत्रणात वापरल्या जातात. ट्रायकोडर्मा बुरशी हानिकारक बुरशीवर हल्ला करून त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते परिणामी जमिनीतील हानिकारक बुरशी कमी होते .
ट्रायकोडर्मा वापरण्याची पध्दत :
१) बीज प्रक्रिया:-
ट्रायकोडर्मा ही बुरशी वापरण्याची सर्वात सोपी आणि उपयुक्त पध्दत म्हणजे बीज प्रक्रिया.
बिजप्रक्रिया करताना पेरणीचे वेळी ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रती १ किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी.
सर्व बियाण्यावर सारखा थर होईल याची काळजी घ्यावी.
बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी.
२) माती प्रक्रिया :-
ट्रायकोडर्मा ही बुरशी वापरण्याची दुसरी पद्दत म्हणजे माती प्रक्रिया.
माती प्रक्रिया साठी ५ किलो ट्रायकोडर्मा भुकटी ५०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळावी व एक हेक्टर क्षेत्रात पसरवून मातीत मिसळावी व पाणी द्यावे.
३) द्रावणात रोपे बुडविणे:-
ट्रायकोडर्मा ही बुरशी वापरण्याची तिसरी पद्दत म्हणजे द्रावणात रोपे बुडविणे
रोपे तयार झाल्यानंतर लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा या बुरशीची ५०० ग्राम पावडर ५ लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व त्यात रोपाची मुळे बुडवून नंतर त्यांची लागवड करावी.
यामुळे रोपांच्या मुळावर होणारा हानिकारक बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो.
४) फवारणी:
१० मि.ली. किंवा ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति लिटर पाणी या प्रमाणात पिकांवर फवारणी करा.
पानांच्या दोन्ही बाजूंवर फवारणी करा आणि शक्यतो संध्याकाळी फवारणी करा.
५) आळवणी:
२० मि.ली. किंवा ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करा.
हे द्रावण पारंपरिक पद्धतीने किंवा फवारणी पंपाच्या मदतीने झाडाच्या मुळांजवळ सोडा.
ट्रायकोडर्मा बुरशीचे फायदे
१) बीज प्रक्रिया केल्याने उगवणशक्ती वाढते.
२) जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजवून देण्यास तसेच जमीन सुधारण्यात मदत होते.
३) हानिकारक बुरशीचा नाश होतो.
४) पिकाचे संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.
५) जमिनीतून पसरणाऱ्या रोगांचा प्रसार थांबतो.