मका हे पिक घेत असताना खत व्यवस्थापन योग्यरीत्या करणे महत्वाचे आहे. खत व्यवस्थापन वेळेत व योग्य केल्यास उत्तम पिक आरोग्य व उत्पादनात वाढ होते. खत व्यवस्थापन जरीही मका पिकासाठी महत्वाचे असले, तरीही योग्य लागवड पद्धती झाडांची स्पर्धा कमी करते. याबद्दल मागील पोस्ट मका लागवड पद्धती मध्ये माहिती जाणून घेतली. खत व्यवस्थापन समजून घेणे खूप महत्वाचे आहे. कारण मका हे उच्च पोषक घटकांना प्रतिसाद देणारे पीक आहे. म्हणजेच त्याला मोठया प्रमाणात पोषक तत्त्वांची आवश्यकता असते.
नत्र, स्फुरद व पालाश सोबतच झिंक हे सुद्धा मका पिकाच्या वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी महत्वाचे आहे. पेरणीच्या ५ ते ६ दिवस अगोदर झिंक सल्फेट हे एकरी १० किलो प्रमाणात शेण खतात मिश्रित करून ठेवावे व पेरणीच्या दिवशी पूर्ण शेतात शेणखत टाकावे. बरेच शेतकरी झिंक सल्फेट रासायनिक खातांमध्ये मिसळून पेरणीवेळी टाकतात पण हे टाळणे महत्वाचे आहे. कारण झिंक सल्फेट रासायनिक खतांमध्ये थेट मिसळल्यास काही समस्या निर्माण होऊ शकतात.
झिंक सल्फेट व रासायनिक खते मिसळल्याने निर्माण होणाऱ्या समस्या
- झिंक सल्फेट व DAP एकत्र केल्यास रासायनिक क्रिया होऊन झिंक फॉस्फेट हा पाण्यामध्ये न विरघळणारा घटक तयार होतो.
- झिंक फॉस्फेट पाण्यात न विरघळल्याने ते मातीत स्थिर होते व पिकाचे मूळ त्याला शोषू शकत नाही.
- यूरिया सोबत झिंक सल्फेट मिसळल्यास खत पाणी धरून दगड तयार होतात.
खत व्यवस्थापन
- पेरणीच्या वेळी मक्यामध्ये Croptek ११:३४:१४ किंवा ९:२४:२४ या मिश्रखतांचा वापर एकरी दोन बॅग असा करावा.
- पेरणीच्या ३० दिवसांनी ४० किलो यूरिया प्रति एकर या प्रमाणात वापरावा.
- पेरणीच्या ६० ते ७० दिवसांनी ४० किलो यूरिया प्रति एकर या प्रमाणात वापरावा. पेरणीच्या ३० व ६० दिवसांनी यूरियाची टॉप ड्रेसिंग केल्याने कणसाचे वजन वाढण्यास व अधिक दाणे भरण्यास मदत होते.
- गरज असल्यास मक्यामध्ये फुलोरा येण्या अगोदर जर झिंक सल्फेट व यूरियाची फवारणी केल्यास, मका पिकाचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. फवारणी करताना काळजी घ्यावी कि, ०.५% ते २.०% यूरिया व ०.५% झिंक सल्फेटचे द्रावण वापरावे. अधिक प्रमाणात वापरल्यास झाडाची पाने करपू शकतात.
तर खत व्यवस्थापन करताना खत तीन टप्प्यात द्यावे व सर्वात महत्वाचे म्हणजे, झिंक सल्फेट हे रासायनिक खतांमध्ये मिसळणे टाळावे. अश्या प्रकारे खत नियोजन केल्यास उत्पादनात खात्रीशीर वाढ होईल.