हरभरा हे महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगामातील सर्वात जास्त घेण्यात येणारे पीक आहे. हरभरा उत्पादनात महाराष्ट्र हे भारतातील अधिक उत्पादन घेणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. हरभरा उत्पादन घेताना सर्वात महत्वाचा व मोठा समस्या म्हणजे मर रोग. मर रोगामुळे दरवर्षी हरभरा उत्पादनात घट येत आहे. त्यामुळे योग्य उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करून पिकावर येणार मर रोग टाळता येतो व उत्पादनात वाढ करता येईल. हा दरवर्षी येणार मर रोग कमी करण्यासाठी जाणून घेऊ योग्य हरभरा लागवड तंत्रज्ञान.
जमीन आणि पूर्वमशागत
I) हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
II) उन्हाळ्यात खोल नांगरट करावी त्यामुळे जमिनीत असलेले बुरशी नष्ट होते.
III) पीक फेरपालट करणे गरजेचे आहे. शेतात सतत हरभरा पीक घेतल्याने मर रोग अधिक वाढतो.
पेरणी
हरभरा पीक पेरणी योग्य वेळेत करणे गरजेचे आहे. १५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरणी करावी. जास्त अगोदर किंवा उशिरा पेरणी केल्यास रोगाचा धोका वाढतो.
पद्धत:
I) बीबीएफ पद्धत /रुंद सरी वरंबा पद्धत वापरल्यास पाण्याचा योग्य निचरा होतो आणि अधिक उत्पादन मिळते.
II) जोड ओळ पद्धतीचा वापर करून उत्पादन अधिक होण्यास मदत मिळते व यामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करता येतो.
III) बेडवर ठिबक सिंचनावर हरभरा पीक टोकन पद्धतीने लागवड केल्यास उत्पादन वाढते.
अंतर:
दोन ओळींमधील अंतर ३० सेंमी ठेवावे आणि दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे.
वाण
हरभरा पीक पेरणीच्या वेळी मर रोगास प्रतिकारक व अधिक उत्पन्न देणारे वाण निवडावे.
देशी वाण: BDNG ९-३, आकाश, दिग्विजय, जॅकी-९२१८, फुले विक्रम, फुले विक्रांत, पिडिकेव्ही कांचन
कबुली वाण: BDNGK-७९८, विराट, काक-२, पिडिकेव्ही -४ आणि फुले कृपा
बियाणे:
प्रति एकर ३० ते ३५ किलो बियाणे (लागवड पद्धती व बियाणे आकारावर अवलंबुन).
बीजप्रक्रिया:
मर आणि मूळकूज रोगापासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा लावावे किंवा कार्बेन्डॅझिम २५%, मॅन्कोझेब ५०% डब्लूएस या संयुक्त बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
खत व्यवस्थापन
पेरणीच्या अगोदर शेणखत हेक्टरी ५ टन या प्रमाणात वापरावे.
मर रोग कमी करण्यासाठी ५ किलो ट्रायकोडर्मा १००किलो शेणखतात मिसळून १० ते १४ दिवस झाकून ठेवावे. ट्रायकोडर्मा वाढ व्हावी म्हणून २ ते ३ दिवसांनी मिसळत राहावे. यावेळी ओलावा टिकून ठेवावा व पेरणीच्या वेळी हे मिश्रण शेतात टाकावे.
कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी करताना २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद प्रति हेक्टर म्हणजेच ४४ किलो यूरिया आणि २५० किलो सुपर फॉस्फेट किंवा १०० किलो डीएपी द्यावे.
बागायती हरभरा पेरणी करताना २५ किलो नत्र ५० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रति हेक्टर म्हणजेच ५० किलो यूरिया ३०० किलो सुपर फॉस्फेट आणि ५० किलो म्युरेट पोटॅश अथवा १२५ किलो डीएपी प्रति हेक्टरी अधिक ५० किलो म्युरेट पोटॅश प्रति हेक्टरी द्यावे.
हरभऱ्याला जस्त व गंधक या सुक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते म्हणून २० किलो झिंक सल्फेट व २० किलो गंधक प्रति हेक्टरी द्यावे.
पाणी व्यवस्थापन
हरभरा पिकास जास्त पाण्याची आवश्यकता नसते. गरज भासल्यास पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिले ४० ते ५० दिवसांनी दुसरे व ६० ते ६५ दिवसांनी तिसरे पाणी द्यावे.
तुषार सिंचन पद्धत हरभरा पिकासाठी अतिशय फायदेशीर ठरते. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा मुळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.
आंतरमशागत
पिकांच्या चांगल्या वाढीसाठी तण नियंत्रणासाठी नियमित खुरपणी करावी किंवा शिफारशीनुसार तणनाशकाचा वापर करावा.
पिकाची योग्य वाढ होण्यासाठी शेंडे खुडणी करावी जेणेकरून फांद्यांची वाढ चांगली होईल.
रोग आणि कीड व्यवस्थापन
मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोगप्रतिकार की जातींची निवड करावी आणि बीजप्रक्रिया करावी.
घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट ५ एस.जी. ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
काढणी
घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी. यानंतर धान्यास ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा. त्यामध्ये कडुलिंबाचा पाला घालावा. त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही.
रोगप्रतिकारक वाणांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, पिक फेरपालट आणि जमिनीची आरोग्यदायी स्थिती राखल्यास मर रोगाचे प्रमाण कमी करता येते.
मका लागवड पद्धती याबद्दल माहिती या लिंक द्वारे वाचा मका लागवड पद्धती